कापलंय , भाजलंय , खरचटलय ?
कुठेही पडल्यानंतर एकतर आपल्याला मुका मार लागू शकतो, खरचटलं जाऊ शकतं किंवा कापलं जाऊ शकत.
सर्वप्रथम , घाबरून जाऊ नका. मदतीसाठी (शक्य होईल तेवढ्या मोठ्याने) हाक मारा.
कापलं गेल्यानंतर काय कराल?
- कुठल्याही जागेवर कापलं गेल्यानंतर खूप रक्तस्त्राव होतो. तो थांबवण्यासाठी प्रयत्न करा.
- कापलेल्या जागेवर कुठलीही पावडर , हळद अथवा टूथपेस्ट भरू नका. मिळेल त्या स्वच्छ कपड्याच्या साहाय्याने त्या जागेवर दाब देऊन घट्ट बांधल्याने आणि हाताचा अथवा पायाचा भाग हृदयाच्या पातळीपेक्षा वर ठेवल्याने तात्पुरत्या स्वरूपात रक्तस्त्राव आटोक्यात येतो.
- त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांकडे दाखवुन , त्वचेच्या आतमध्ये काही स्नायुबंध , मांसल भाग, नसा , यांना मार तर लागला नाहीये याची खात्री करून घ्यावी. आणि आवश्यकतेनुसार टाके टाकून घ्यावेत. टाक्यांबद्दल समज , गैरसमज आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
खरचटलेल्या जखमेसाठी काय कराल?
- खरचटल्या मुळे झालेली जखम खूप जास्त वेदनादायक असते कारण यात त्वचेचा वरचा पापुद्रा घासला गेल्याने नर्व्ह एंडिंग्स उघड्या पडतात आणि साध्या हवेमुळे किंवा पाण्यामुळेही तीव्र वेदना होतात.
- अश्या जखमा वेळीच जर चांगल्या पद्धतीने साफ केल्या गेल्या नाहीत तर त्या सावळतांना मातीचे सूक्ष्म कण तिथेच राहुन नंतर काळे डाग दिसतात. ( Posttraumatic Tattoing )
- शक्यतो भूल दिल्यानंतर असे मातीचे कण काढणे सोयीचे ठरते. व्यवस्थित रित्या साफ केल्यानंतर त्यावर न चिकटणारी प्राथमिक पट्टी ( Primary Dressing ) लावावी. ( ह्याला टुले ग्रास असे म्हटले जाते. ) आणि मग त्यावरून डॉक्टरांनी दिलेले मलम दिवसातून २ ते ३ वेळा लावावे.
- साधारणतः ७ ते ८ दिवसात या जखमा सावळतात. सावळल्यानंतर कमीत कमी २ ते ३ महिने त्यांना सूर्यप्रकाशापासून वाचविणे फायद्याचे ठरते; अन्यथा नवीन आलेली त्वचा काळवटण्याची खूप दाट शक्यता असते. त्यासाठी बॅरिअर ( म्हणजे स्कार्फ बांधणे , टोपी घालणे ) किंवा सन स्क्रीन लोशन वापरलेले बरे.
भाजले गेल्यानंतर काय कराल?
- सर्वप्रथम ज्या गोष्टीमुळे भाजले गेले आहे त्या गोष्टीवर नियंत्रण घ्या म्हणजे अजून इजा होणे टळेल. म्हणजे जर आग लागले असेल तर ती आटोक्यात आणा , गरम तेल सांडले गेले असेल तर ते पुसून घ्या, गरम पाण्यात हात गेला असेल तर तो बाजूला काढा , इत्यादी )
- भाजलेल्या भागाजवळची आभुषणे आणि कपडे काढून टाका. त्वचेला चिकटलेले कपडे घरी ओढण्याचा प्रयत्न करू नका.
- कारण काहीही असो, भाजले गेल्यानंतर त्या जागेवरून खूप वेळ वाहते पाणी गेल्यास त्वचेची होणारी हानी कमी होते. त्यासाठी हात , पाय, नळाच्या पाण्याखाली काही मिनिटे ठेवल्यास योग्य. तसेच मर्यादित जागी भाजले गेल्यास बर्फ लावला तरीही असाच फायदा मिळतो. ( Pour water on Burns )
- जर चेहऱ्याचा कुठलाही भाग भाजला गेला असेल तर झोपून राहण्यापेक्षा बसून राहिलेले चांगले , याने सूज लवकर कमी व्हायला मदत होते.
- ह्या प्रथमोपचारानंतर लवकरात लवकर प्लास्टिक सर्जनना दाखवून घ्या.
- साधारणतः १५ वर्षे वयाच्या पुढे १० ते १५ भाजलेल्या रुग्णांना दवाखान्यात दाखल करायची गरज पडत नाही. परंतु, वय कमी असल्यास , जास्त खोलवर त्वचा भाजले गेली असल्यास , चेहऱ्याचा जास्त भाग किंवा जननेंद्रिय भाजले गेले असल्यास दवाखान्यात देखरेखीसाठी आणि पुढील उपचारासाठी दाखल करण्याची गरज असते.
घरात किंवा भोवतालच्या परिसरात लहान मुलांना इजा होऊ नये म्हणून घ्यावयाची सर्वसाधारण काळजी :
- फर्निचर च्या कॉर्नर्स ला प्रोटेक्टिव्ह कुशन्स लावून घ्या.
- इलेक्ट्रिक सॉकेट्स चिकटपट्टीने कव्हर करून घ्या जेणेकरून मुलं त्यात हात घालणार नाहीत. सॉकेट्स जर जास्त खाली असतील तर इलेक्ट्रिशियन कडून ते निकामी करून घेतलेले फायद्याचे.
- बाल्कनी मधील संरक्षक ग्रिल्सची उंची वाढवून घ्या
- धारदार वस्तू जसे ब्लेड्स , चाकू , स्क्रू ड्राइव्हर , कात्री , इत्यादी मुलांच्या हाताला लागणार नाही याची काळजी घ्या.
- गरम वस्तू ( जसे भाजी , वरण , तळल्यानंतर तेल ) किचन टॉप च्या भिंतीजवळच्या बाजूला ठेवा म्हणजे मुलांचा हात तिथपर्यंत पोहचणार नाही.
- दरवाज्यांना पाठीमागे चांगल्या प्रतीचे स्टॊपर्स लावून घ्या म्हणजे हवेने दार आपोआप लागल्यास हाताची बोटं दरवाजा आणि चौकटीच्या मध्ये येऊन इजा होणे टळेल.