पावसाळा हा नयनरम्य निसर्ग सौंदर्य अनुभवण्याचा ऋतू आहे. परंतु हे सौंदर्य अनुभवतांना आपल्या पायांची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे जेणेकरून नंतर होणाऱ्या व्याधी टळतील.
पावसाळ्यात अशी घ्याल आपल्या पायांची काळजी :
१. बाहेरून आल्यानंतर पाय व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवुन घ्या ; कारण अधिक वेळ पाय पाण्यात असल्यानंतर त्यातला ओलावा आणि वातावरणातील आर्द्रता यांमुळे गजकर्ण ( सामान्य भाषेत चिखल्या ) व्हायची दाट शक्यता असते.
२. पाय नियमित रित्या कोरडे ठेवा ( खासकरून दोन बोटांमधील जागा ) जेणेकरून गजकर्ण किंवा इतर जंतुसंसर्ग ( जे ओलाव्यामुळे फोफावतात ) होणे टळेल. पाय धुतल्यानंतर हि जागा स्वच्छ कपड्याने आणि हलक्या हाताने कोरडी करा. जास्त घासल्यास आधीच ओलसर झालेली त्वचा घासली जाऊन ती निघून येईल ( अश्यानेहि इन्फेक्शन्स वाढायला मदत होते ) .
३. व्यवस्थित कोरडे केल्यानंतर जर पायांची त्वचा शुष्क वाटत असेल तर मॉइस्चराइजिंग क्रीम लावा. क्रीम लावतांना दोन बोटांच्या मधील जागेत ते लावू नका.
४. वातावरणात असलेल्या आर्द्रतेमुळे पायांना अधिक घाम येतो आणि पाय ओले होतात. हे टाळावे म्हणून पायावर आणि बोटांच्या मध्ये मोजे घालण्याआधी चांगल्या प्रतीची पावडर लावलेली फायद्याचे ठरते. सगळी काळजी घेऊनही जर पायांमधून घाण वास येत असेल तर आपणास गजकर्ण झाल्याची शक्यता आहे. असे असल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा.
५. पायताण कसे असावे ? : रुंद, मऊ , शक्यतो निमुळते आणि टाचेच्या बाजूला जास्त उंच असणारे नसावेत. समोरच्या बाजूने उघडे असणारे सँडल्स किंवा फ्लिप फ्लॉप्स वापरल्यास चिखल पायांच्या सानिध्यात जास्त वेळ राहत नाही. महत्वाची गोष्ट म्हणजे एकमेकांचे पायताण वापरणे ( खासकरून पावसाळ्यात ) टाळावे. योग्य मापाची चप्पल / बुटं वापरावीत. वेळोवेळी बुटांची तपासणी करून आतमध्ये खडे / काटा / खिळे तर नाहीत ना याची शहानिशा करून घ्यावी. खासकरून मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी हि काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे.
६. पायाच्या बोटांची नखे जास्त वाढल्यास त्याखाली धूळ , माती जमा होते. त्यामुळे नखे नेहमी छोटो ठेवावीत. नखे सरळ कापा , खूप खोलवर कापणे टाळा. ( जास्त खोलवर कापल्यास नखे बाजूच्या त्वचेत वाढून तिथे जंतुसंसर्ग होतो. )
७. रोज झोपण्याच्या आधी पाय स्वच्छ करून त्यांची तपासणी करून घ्या. आवश्यकता भासल्यास आरश्याचा वापरही आपण करू शकता. असे केल्याने जर पायाला काही छोटी जखम झाली असेल तर लगेच लक्षात येईल आणि त्यावर उपचार करून घेणे शक्य होईल.
जर आपणास मधुमेह असेल तर नियमित डायबिटिक फूट सर्जन ( प्लास्टिक सर्जन्स हे डायबिटिक फूट संबंधित गोष्टींचा उपचार करण्यात अधिक पारंगत असतात ) ची भेट घेत राहा, म्हणजे काही समस्या असल्यास त्याचे लवकर निदान होऊन उपचार सुरु होईल. अधिक माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा