त्वचेवरील पांढरे डाग

Vitiligo (कोड) या गोष्टीभोवती समाजात अनेक गैरसमज आहेत. आपण हे जाणून घेणे गरजेचे आहे कि हे फक्त त्वचेच्या बाह्यरूपामध्ये आलेला एक बदल आहे. त्याचा शरीराच्या कुठल्याही अवयवाशी किंवा नशिबाशी संबंध नाही! त्यामुळे अश्या व्यक्तींकडे बघताना आपल्या मनात घृणा किंवा करुणा येता कामा नये.

 

 

कोड हा एक आजार  आहे ज्यामध्ये त्वचेच्या  रंगद्रव्य पेशी (मेलॅनोसाईट्स) विशिष्ट भागात नष्ट झाल्यामुळे त्वचेवर पांढऱ्या रंगाचे डाग दिसू लागतात . ह्या पेशी कमी होण्याचे नक्की कारण माहित नाही पण अनेक गोष्टींमुळे ते होऊ शकते.

कारणांमध्ये मानसिक तणाव, Autoimmune Disease (शरीर स्वत:च्याच पेशीजालांना प्रतिद्रव्ये निर्माण करते असे रोग), पालकांना हा आजार असणे ,आणि अश्या अनेक गोष्टींचा समावेश आहे .

कुठलेही लिंग अथवा वय ह्या गोष्टीला अपवाद नाही . साधारणतः १० ते ४० वर्षे वयामध्ये त्याची सुरुवात होते .  पालकांना हा आजार असल्यास मुलांमध्ये असण्याची संभावना जास्त असते पण पालकांना नसल्यास मुलांना होणार नाही असे बिलकुल नाही.

सूर्यप्रकाशा खाली असणाऱ्या शरीराच्या भागांमध्ये (जसे हात, पाय, हात, चेहरा आणि ओठ ) पांढरे चट्टे जास्त प्रमाणात आढळून येतात. जननेंद्रिय किंवा गुदद्वाराभोवती , डोळ्याभोवती, पापण्यांवर  पण हे चट्टे आढळतात.

 

त्वचेवर पांढरे चट्टे आढळल्यानंतर घाबरून न जात प्रथमतः त्वचारोग तज्ज्ञांकडून व्यवस्थित तपासणी , निदान आणि मग औषधोपचार चालू करावा. बहुतांशी रुग्णांमध्ये गोळ्या, औषधे आणि अतिनील किरणांशी संपर्क (UV -A Therapy) यांनीच हे चट्टे नाहीसे होतात (साधारणतः ४ महिने ते २ वर्षे इतका कालावधी त्यात जाऊ शकतो)

 

जे पांढरे चट्टे औषधोपचार नंतर नाहीसे होत नाहीत परंतु त्यांचा आकार हा कमीत कमी ६ महिन्यांच्या कालावधीमध्ये वाढत नाही अश्या चट्ट्यांसाठी प्लास्टिक सर्जरी हा उत्तम पर्याय ठरतो . यामध्ये चट्ट्यांवरील त्वचा हि  विशिष्ठ प्रक्रियेद्वारे (LASERs किंवा Microdermabrasion) तयार केली जाते आणि त्यावर (आपल्याच शरीरावरुन घेतलेला ) त्वचेचा पापुद्रा किंवा त्यापासून प्रक्रिया करून रंगद्रव्य पेशी (Melanocyte Transfer) पसरविल्या जातात. काही दिवसांच्या ड्रेसिंग नंतर बाधित जागेवर सभोवतालच्या त्वचेसारखाच रंग दिसू लागतो . छोट्या चट्ट्यांसाठी हा सर्वात उत्तम पर्याय असून ह्याच्यासाठी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट राहण्याची गरज नाही. ऑपरेशन च्या २ ते ३ तासानंतर आपण घरी जाऊ शकता. अगदीच छोटे चट्टे असतील तर त्यांना प्लास्टिक सर्जरीच्या अनेक पद्धती वापरून कमी दिसतील अश्या पद्धतीने टाके पण घेतले जाऊ शकतात.

 

शरीरावर अधिक प्रमाणात चट्टे (एक्सटेन्सिव्ह व्हिटीलीगो) असतील तर, खालील पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत:

१. Skin Camouflage (चट्ट्यांवर कॉस्मेटिक्स लावून तो भाग सभोवतालच्या त्वचेसारखा भासवणे)

२. Skin Depigmentation : फक्त थोडाच भाग जर पांढरा  नसेल तर त्या भागावरून पण रंग नाहीसा करणे ज्यामुळे संपूर्ण त्वचा हि एकाच रंगाची दिसते.

 

डॉ किरण त्रंबक नेरकर 

प्लास्टिक सर्जन ,

आकार हॉस्पिटल , नाशिक 

फोन: ८८८८ २२ ४४ ००