डॉक्टर , किती टाके पडलेत?
प्लास्टिक सर्जरीच्या सिद्धांतांप्रमाणे , कुठलीही जखम जर लवकरात लवकर बंद केली तर दीर्घकाळ जखम असण्यापासून होणारे कॉम्प्लिकेशन्स टळतात.
कुठल्याही ऑपरेशन नंतर सर्जन टाके घालून ती जखम बंद करत असतात.
ऑपरेशन नंतर रुग्णाचे / नातेवाईकांचे काही नेहमीचे प्रश्न असतात , त्यांच्याबद्दल जाणून घेऊ या.
१. डॉक्टर , किती टाके पडलेत?
“जितके जास्त टाके तितके मोठे ऑपरेशन ” हा चुकीचा समज आहे. वस्तुतः दोन टाक्यांच्या मधले अंतर जर कमी असेल तर जखमेच्या दोघे बाजूच्या कातडीवर कमी तणाव निर्माण होतो आणि ती जखम तितक्या चांगल्या पद्धतीने सावळते.
कधी कधी धाव दोऱ्याचा ( Continuous Sutures ) उपयोग केला जातो.
२. डॉक्टर, टाके विरघळणारे आहेत कि काढावे लागतिल ?
विरघळणारे टाके हे शरीरामध्ये काहीतरी प्रक्रिया होऊनच कालांतराने नाहीसे होतात. जितकी प्रक्रिया जास्त तितके इंफ्लेमेशन ( साध्या शब्दात सूज ) जास्त , परीणामी स्कारिंगचे किंवा निशाण जास्त ठळक राहण्याचे प्रमाण वाढते. काढायची गरज असणारे टाके जर टाकलेत तर ह्या गोष्टी टळतात आणि निशाण त्यातल्या त्यात कमी राहते.
काही विशिष्ठ वेळा आम्ही विरघळणारे टाके टाकतो , जसे अगदी लहान मुलांमध्ये , किंवा ज्यावेळेस खूप जास्त टाके टाकण्याची गरज भासते तेव्हा.
३. डॉक्टर, टाक्यांपेक्षा स्टेपल्स टाकलेल्या बरे नाही का?
त्वचा जितक्या चांगल्या पद्धतीने टाक्यांद्वारे एकमेकाला जोडली जाऊ शकते तितकी ती स्किन स्टेपल्स द्वारे जोडली जाऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे टिशू ग्लू च्या उपयोगाबद्दल पण लोकांच्या मनात संभ्रम आहेत. त्वचेचा आतला लेअर ( डर्मिस ) जर व्यवस्थित पणे जोडला असेल तरच ग्लू चा वापर केला जावा , अन्यथा त्वचा व्यवस्थित सावळत नाही. थोडक्यात, टिशू ग्लू वापरणे हा टाक्यांना पर्यायी मार्ग नाही.
४. प्लास्टिक सर्जनने टाके टाकले तरी पण निशाण राहीलच का ?
कुठलीही शस्त्रक्रिया असो , त्यानंतर निशाण हे राहणारच, प्लास्टिक सर्जरीही त्याला वाद नाही. परंतु, त्वचेची व्यवस्थित रित्या केली जाणारी हाताळणी , दुर्बिणीचा प्रयोग , या गोष्टींमुळे प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर निशाण कमी प्रमाणात राहते, काही लोकांमध्ये ते बऱ्यापैकी नाहीसं पण होतं . आपल्या त्वचेचा जखम सावळण्याचा गुणधर्म हा आपल्या गुणसूत्रांवर पण अवलंबून असतो. त्यामुळेच काही लोकांचे टाके अगदी कमी निशाण सोडतात आणि काहींचे जास्त.
५. डॉक्टर , टाके टाकणं गरजेचं आहे का?
कुठलीही जखम आपोआप आपण सावळु दिली तर ती एकतर खराब निशाण मागे सोडते ( टाके टाकण्याच्या तुलनेत ) आणि फाटलेल्या भागांचे अवशेष चुकीच्या पद्धतीने सावळतात. उदाहरणार्थ फाटलेली भुवई, डोळ्याची पापणी, अथवा ओठ ह्यांच्या दोघे / तिघे भागांची जर व्यवस्थित जोडणी केली नाही तर ते विचित्र पद्धतीने सावळून तिथे व्यंग तयार होते. असे होणारे व्यंग नंतर नीट करण्यात जास्त परिश्रम आणि खर्च सुद्धा होतो. हे झालं दिसण्याच्या बाबतीत , तसेच काहीतरी कार्यक्षमतेच्या बाबतीतही आहे. खासकरून सांध्यांच्या जवळच्या जखमा जर व्यवस्थित रित्या बंद केल्या गेल्या नाहीत तर सांध्यांभोवती कॉन्ट्रक्चर बँड्स तयार होतात आणि मग व्यवस्थित रित्या काम करता येत नाही. याचे चांगले उदाहरण म्हणजे भाजल्यानंतर जखडलेली गेली मान , हात , बगल, इत्यादी. ( जर वेळीच प्लास्टिक सर्जनला दाखविले गेले तर अश्या समस्या टाळल्या जाऊ शकतात.)
६. डॉक्टर , आम्हाला साधेच टाके टाकावयाचे आहेत, प्लास्टिक सर्जरी नको.
सिनेमा आणि इतर काही प्रसारमाध्यमांमधल्या चुकीच्या माहितीमुळे जनतेची दिशाभूल होत आहे. इकडची त्वचा काढून तिकडे लावली कि जखम झालेला भाग डागरहित आणि पूर्वी होता तेवढाच सुंदर होतो हीच लोकांची प्लास्टिक सर्जन कडून अपेक्षा असते. परंतु, वर नमूद केल्याप्रमाणे दिसणे आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी जे प्रयत्न प्लास्टिक सर्जन करतात तो प्लास्टिक सर्जरीचाच भाग आहे. या सगळ्यासाठी सूक्ष्म आयुध ( instruments ) , दुर्बिणीतुन बघून टाके टाकणे आणि त्वचेची नाजूक हाताळणी या गोष्टींचा वापर आम्ही करतो. त्यामुळेच , प्लास्टिक सर्जनने टाके टाकल्यास व्रण कमीत कमी राहते!
टाके टाकल्या नंतर काळजी कशी घ्याल?
- १. टाक्यांची जागा कोरडी ठेवा
- २. जंतुसंसर्ग ( इन्फेक्शन ) च्या चिन्हांसाठी तपासणी करा.
- ३. जखमेच्या सभोवतालची जागा खाजवू नका.
- ४. घट्ट कपडे टाळा
- ५. ड्रेसिंग नियमित रित्या बदलून घ्या.
- ६. सूर्यप्रकाशापासून जखमांचा भाग वाचवा
ऑपरेशन थिएटर मधली पहिली ड्रेसिंग सगळ्यात जास्त निर्जंतुक असते. त्यामुळे ती डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय काढू नये.
साधारणतः चेहऱ्यावरील टाक्यांची पट्टी ३ दिवसानंतर काढण्याचा सल्ला आम्ही देतो.
त्यानंतर तो भाग पाण्याने धुतला तरीही हरकत नाही. डॉक्टरांनी दिलेले मलम दिवसातून २ वेळा टाक्यांवर लावावे.
चेहऱ्यावरचे टाके ६ ते ७ दिवसांनंतर डॉक्टरांकडे जाऊन काढून घ्यावेत म्हणजे व्रण कमी राहतो.
टाके काढल्यानंतर टाक्यांची जागा ( Suture Line ) फाकू नये म्हणून विशिष्ठ प्रकारचे टेप किंवा मलम वापरण्याचा सल्ला दिला जातो. हे काही दिवसांसाठी आपल्याला कंटाळवाणे वाटू शकते परंतु पुढे चालून व्रण कमी दिसण्यासाठी किंवा नाहीसा होण्यासाठी ह्या गोष्टींची मदत होते.
हेच टाके जर हातावर असतील तर १० दिवसानंतर आणि पायावर असतील तर १५ दिवसानंतर काढण्याचा सल्ला आम्ही देतो. जर आतमधील काही गोष्टी जसे स्नायुबंध , नसा यांचे हि ऑपरेशन झाले असेल तर मात्र सांगितल्याप्रमाणे प्लास्टर ठेवणे गरजेचे असते अन्यथा जोडलेल्या गोष्टी पुन्हा तुटू शकतात.