हिमोडायलीसीस म्हणजे काय ?
जेव्हा एखाद्या व्यक्तीची किडनी काम करणे कमी करते अथवा बंद पडते , तेव्हा दुषित पदार्थ आणि पाणी बाहेर पडत नाही , आणि या वस्तू शरीरात साठत जातात. ज्यामुळे पेशंटला दम लागणे , शरीराला सूज येणे, असे विविध प्रकारचे त्रास होतात .हिमोडायलीसीस म्हणजे हे सगळे दुषित पदार्थ शरीरातून बाहेर काढून रक्त शुद्ध करण्याची प्रक्रिया .
ए. व्ही. फिश्चुला म्हणजे काय ? हे ऑपरेशन क करून घ्यावे ?
किडनी निकामी झाल्याचे निदान झाल्यावर रुग्णाला वारंवार डायलीसीसची गरज पडते. डायलीसीस करण्याकरिता. ए. व्ही. फिश्चुला हा सर्वात सोयीस्कर मार्ग आहे. हातातील दोन रक्तवाहिन्या Artery (रोहीणी) आणि vein (नीला) यांना विशिष्ठ पद्धतीने जोडण्याच्या प्रक्रियेला ए. व्ही. फिश्चुला ऑपरेशन म्हणतात.
ऑपरेशनच्या आधी काय तयारी करावी ?
ए. व्ही. फिश्चुला ऑपरेशन करण्याची गरज आहे असे ठरताच पुढील काळजी घ्यायला सूरवात करावी. डॉक्टरांनी सांगितल्यास हाताच्या रक्तवाहिन्यांची डॉपलरची तपासणी करून घ्यावी . एका बाजूच्या हाताला ( सर्वसाधारणपणे डावा हात, कारण बहुतेक लोक उजव्या हाताने काम करतात) कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन देणे, सुया टोचणे, रक्त घेणे अथवा देणे, सलायीन लावणे टाळावे. त्या हातावर ब्लडप्रेशर चेक करणे टाळावे. त्या हाताने बॉलचे व्यायाम सुरु करावा. व्यायाम केल्याने रक्तवाहिन्यांचा आकार वाढून ऑपरेशन करणे सोपे जाते.
ऑपरेशनच्या दिवशी हात साबणाने स्वच्छ धुवून हॉस्पिटलला यावे. हातातील बांगड्या, अंगठी, व इतर गोष्टी घरीच काढून ठेवाव्यात. सर्वसाधारणपणे हे ऑपरेशन लोकल अनेस्थेसियात होते (फक्त ऑपरेशनची जागा बधीर केली जाते), त्यामुळे ऑपरेशनला येताना हलका नाश्ता करून यावा. डायबेटीस व बी. पी. ची औषधे नेहमीप्रमाणेच घेऊन ऑपरेशन साठी यावे.
ऑपरेशनची माहीती
ऑपरेशन करताना पेशंटला दीड ते दोन तास पाठीवर झोपावे लागते. ऑपरेशनची जागा बधीर करून रक्तवाहिन्यांना जोडण्याचे किचकट ऑपरेशन सूक्षाम्दर्शिकेच्या सह्हायाने केले जाते. ऑपरेशनच्या आधी दम लागत असल्यास अथवा पाठीवर झोपता येत नसल्यास तशी कल्पना आधी डॉक्टरांना द्यावी.
ऑपरेशनचे संभाव्य कोम्प्लिकेशन, बिघाड आणि गुंतागुंत
ऑपरेशनच्या जागेतून रक्तस्त्राव होणे.
ऑपरेशनच्या जागेवर पस (इन्फेक्शन) होणे.
ऑपरेशनच्या जागेवर रक्ताची गाठ अडकून फिश्चुलाचे ऑपरेशन निकामी (फेल) होणे.
हातावर सूज येणे, बोटे काळीनिळी पडणे अथवा हातातील बोटांवर जखमा होणे. यापैकी काहीही जाणवल्यास त्वरित जवळच्या दवाखान्यात दाखवावे.
फिश्चुलाचे ऑपरेशन झाल्यानंतर काय करावे ?
डॉक्टरांनी दिलेली औषधे व्यवस्थीत घ्यावी.
हात खालती लोंबकळून ठेवू नये. झोपताना हात हृदयाच्या पेक्षा वरील उंचीवर २-३ उशांवरती ठेवावा. मनगटाजवळ ए. व्ही. फिश्चुलाचे ऑपरेशन केले असल्यास मनगट डोक्याखाली (सवय असल्यास) ठेवले जाऊ नये याची काळजी घ्या, अन्यथा फिश्चुलावर दाब येउन तो बंद पडेल.
ऑपरेशन झाल्यानंतर ४-५ तासानंतर बॉलचे व्यायाम सुरु करावेत. ते केल्याने फिश्चुला लवकर परिपक्व| (Mature) होतो व त्यामधून लवकर डायलीसीस करायला सुरुवात करता येते. फिश्चुला परिपक्व व्हायला ४ ते १० आठवडे इतका वेळ लागू शकतो. साधारणपणे स्व्कीझ बॉल हा पटापट दहा वेळा दाबून सोडावा. असा व्यायाम दिवसातून ८ ते १० वेळा करावा. याव्यतिरिक्त कपडे वळत घालण्याच्या पिनांची उघडबंद पण अशाच पद्धतीने करावी.
हाताच्या कोपराजवळ फिश्चुलाचे ऑपरेशन केले असल्यास वरील व्यायामाव्यतिरिक्त पुढे नमूद केल्याप्रमाणे व्यायाम करावेत. साधारण १ किलो वजन अथवा वजनाचे समान घेऊन हात कोपरातून वर खाली करावा. असे दिवसातून ८ ते १० वेळा आणि प्रत्येक वेळी १० मिनटे हा व्यायाम करावा.
हाताभोवती आवळणारे घट्ट कपडे, दागिने , बांगड्या ऑपरेशननंतर घालू नये. ऑपरेशन झालेल्या हाताने खूप जड सामान उचलू नये. ऑपरेशन झालेल्या हातावर कुठल्याही प्रकारचे इंजेक्शन देणे, सुया टोचणे, रक्त घेणे अथवा देणे, सलायीन लावणे टाळावे. ज्या हातावर ब्लडप्रेशर चेक करणे टाळावे. डायलीसीस करताना फिश्चुलामध्ये टोचलेल्या सुया काढल्यानंतर थोडा वेळ त्या जागेवर दाब देऊन ठेवा.